नवी मुंबई - कौटुंबिक हिंसाचार, जातीय शिवीगाळ, अन्य महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध असे गंभीर गुन्हे गजानन काळे यांच्यावर दाखल झाले आहेत. तर त्यांना अजूनही अटक न झाल्याने पोलीस काळे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. गजानन काळे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालया समोर गृहमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्र्यांना गाठून काळे यांना अटक कधी होणार, असा जाब त्यांनी विचारला. तर याप्रकरणी लवकरच कारवाई करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.
पत्नीने केले होते आरोप -
नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शारीरिक व मानसिक छळ, जातीवाचक बोलणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेली १३ वर्ष गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा तसेच त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने केला आहे.
पत्नीने केला होता भ्रष्टाचाराचा आरोप -
नवी मुंबईतील मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी दोन दिवसांपूर्वी काळे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. 'माझे पती गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केला आहे', असे खळबळजनक वक्तव्य काळे यांच्या पत्नीने केले होते. तसेच एका जागेच्या भरतीसाठी अडीच लाख रुपये घेतले होते. या भ्रष्टाचारामध्ये पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली आहे, असेही त्या म्हणाल्या. शिवाय पोलीस माझ्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी माझ्यावरच दबाव आणत आहेत. गेले पाच दिवस होऊनही गजानन काळेंवर कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच पत्रकारही मेसेज पाठवून माझ्यावर दबाव आणत आहेत, असे आरोपही संजीवनी काळे यांनी केले होते.
हेही वाचा - इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी करून दाखविले, आता भाजपाची वेळ - खासदार संजय राऊत