मुंबई - राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी संध्याकाळी शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेनेच एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी झेंडे उंचावून, फटाके फोडून वाजत गाजत या सोहळ्याचा उत्सव साजरा केला. पाहुयात काही जिल्ह्यातील आनंदोत्सवाचे क्षण...
बुलडाणा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बुलडाण्यात जयस्तंभ चौक परिसरात तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आलेत. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह शहरातील इतर नेत्यांचा समावेश होता. तसेच तिन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, झेंडे उंचावून हा उत्सव साजरा केला.
हेही वाचा - बुलडाणा: तलाठी कार्यालयाला संतप्त शेतकऱ्यांकडून चपलांचा हार
सोलापूर - शहरातील बाळी वेस भागातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच शिवसेनेचे नगरसेवक या जल्लोषात सहभागी झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी वर्गाला न्याय मिळणार आहे. पुढील ५ वर्षे राज्यात चांगले दिवस येतील अशी आशा यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - करमाळा : साडे ग्रामपंचायतीमध्ये गटारीतील घाण टाकून ग्रामस्थांचे आंदोलन
धुळे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा होती. ठाकरे यांच्या शपथविधीनंतर महाविकासाघाडीच्या वतीने धुळ्यात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच महाविकासाघाडीने एकच जल्लोष केला होता.
हेही वाचा - धुळे महापालिकेत विकासकामांवरून नगरसेवकांनी घातला गोंधळ
ठाणे - एकनाथ शिंदे यानी मंत्री पदाची शपथ घेतल्यावर ठाण्यात जल्लोष करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवत, नाचत, गात आनंद साजरा केला.