मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडी सरकारला मोठ्या प्रमाणात यश आले ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे आमच्यावर आता जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेने आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांनी दिलेल्या आशीर्वादाला सार्थ करून दाखवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
हा जनतेचा कौल -
राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीला यश मिळाले आहे. यशाच्या पार्श्वभूमीवर सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारचे राज्यात चांगले काम सुरू आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असल्यानेच महाविकास आघाडीला हे यश मिळाले आहे. आम्ही वर्षभरामध्ये राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी जे काही कामे केली त्याची पावती जनतेने दिली आहे. लोकांची कामे केल्यानंतर लोक आपल्याला स्वीकारतात हे या निवडणुकीतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सुळे म्हणाल्या.
आम्ही संस्कारांचे भान ठेऊन वागतो -
अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला अपयश आले. या ठिकाणी महाविकासआघाडी म्हणून तातडीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारवर अद्यापही विरोधक टीका करत आहेत. यश-अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. आम्ही या यशाकडे एक जबाबदारी म्हणून पाहतो. आदरणीय पवार साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांचे संस्कार मिळाले आहेत, त्यामुळे या संस्काराचे भान ठेवूनच आम्ही वागतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाविकास आघाडीचा चार जागांवर विजय -
महाविकास आघाडी निर्माण झाल्यापासून तीन पक्षांची एकत्रित पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भाजपासमोर महाविकास आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले होते. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा भाजपा एकटा पक्ष सर्वांना पुरून उरेल, असेही म्हटले होते. मात्र, विधानपरिषदेच्या निकालानंतर वेगळे चित्र पहायला मिळाले असून एकूण 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे हे मोठे यश मानले जात आहे.