मुंबई - कोरोनाच्या विरोधातील लढाई सरकार गांभीर्याने घेत नसून या लढाईत सर्व स्तरावर झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत सरकारला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन आज (शुक्रवारी) करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपापल्या घराच्या आवारातच काळ्या फिती लावून आणि सरकारला आवाहन करणारे फलक लावून आंदोलन करावे ,असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे आणि विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश कार्यालय येथे सकाळी 11 वाजता सामील होणार आहेत.
हेही वाचा - राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, एकाच दिवशी १ हजार ४०८ रुग्णांना डिस्चार्ज
दरम्यान, राज्यात गुरूवारी २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ पोहोचली आहे. राज्यात गुरूवारी १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.