मुबंई - पूर्व उपनगरातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जंगलेश्वर महादेव मंदिराचा तीन दिवशीय महाशिवरात्री महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे नागरिक व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाच्या सूचनेनुसार यंदा अनेक जिल्हे व तालुक्यातील स्थानिक उत्सव रद्द झाले आहेत. हिंगोली नागनाथ यात्रा आणि भीमाशंकर महाशिवरात्री उत्सव देखील रद्द झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट वाढत असून, या प्रभावातून बचाव करण्यासाठी मुंबईत साजरे होणारे अनेक उत्सव रद्द करण्यात आले आहेत.
पुढच्याच आठवड्यामध्ये महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर पश्चिम परिसरात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये दिनांक 10, 11 व 12 मार्च असा तीन दिवस महाशिरात्र उत्सव साजरा करण्यात येणार होता. मात्र कोरोनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
भाविकांना गर्दी टाळण्याचे आवाहन
श्री जंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. तसेच तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. मात्र यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच महाशिवरात्रीला भक्तांनी मंदिरात गर्दी करू नये, भाविकांनी घरीच राहून महादेवाची उपासना करावी, असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.