मुंबई : राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे, परंतु आता सुर्य देव कोपला आहे. राज्यात तापमान वाढीत झपाट्याने वाढ होत आहे. काही ठिकाणी ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला गेला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशा पार गेले असून उन्हाचा तडाका सुद्धा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
घराबाहेर पडणे कठीण : हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम असणार आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आव्हान सुद्धा हवामान खात्याने केले आहे.
तापमानामध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हाचे चटके सकाळपासूनच जाणवू लागल्याने अनेक शहरांत रस्त्यावरील वर्दळ सुद्धा कमी झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंश पार गेला आहे. तसेच जळगांव, अकोला, वर्धा, सोलापूर, बारामती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नांदेड, धाराशिव, जालना, बीड येथील तापमान ४० अंशा पार नोंदवले गेले आहे.
दक्षिण विदर्भासाठी दोन दिवस धोक्याचे : मोखा हे चक्रीवादळ सध्या अंदमान-निकोबार येथे आहे. मात्र, लवकर मोखा चक्रीवादळ बर्माच्या दिशेने सरकायला सुरुवात करेल. १४ ते १५ मे दरम्यान मोखा चक्रीवादळ र्मा येथे हिट करेल, असा अंदाज आहे. या दरम्यान उत्तरीय राज्याकडून वाहणाऱ्या हवेचा वेग तीव्र होईल, त्यामुळे दक्षिण विदर्भात तापमान २ ते ३ डिग्री वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून हिट वेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला विदर्भातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. अकोल्यात ४४.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.६, ब्रम्हपुरी ४१.२, चंद्रपूर ४१.६, गडचिरोली ४०.०, गोंदिया ४२.५, नागपूर ४२.०, वर्धा ४३.४, यवतमाळ ४२ डिग्री तापमान नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा : Cyclone Mocha : मोचा चक्रीवादळ होणार तीव्र, बंगालमध्ये 8 एनडीआरएफ पथके तैनात