मुंबई : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आता आणखी आक्रमक झाली आहे. 1 सप्टेंबरपासून परिचारिकांनी काळ्या फिती लावून आपापल्या शहरात आंदोलन सुरू केले आहे. या परिचारिकांनी 8 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, तरीही राज्य सरकार याकडे साफ दुर्लक्ष करत आहे, असे म्हणत आता परिचारिकांनी 'काम बंद आंदोलना'चा इशारा प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
पदभरती, पदोन्नती, पदनिर्मिती करावी आणि 7 दिवस क्वारंटाइनसाठी सुट्टी द्यावी, या मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाची हाक दिली. कोरोनाची परिस्थिती पाहता आरोग्य व्यवस्था कोलमडू नये आणि सरकारला जाग यावी यादृष्टीने 1 सप्टेंबरपासून राज्यभर विविध सरकारी रुग्णालयात काळ्या फिती लावून आंदोलन केले जात आहे. सरकारला परिचारिकांच्या समस्या यादरम्यान समजतील आणि रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, म्हणून आठवड्याभराचा काळ परिचारिकांनी घेतला. मात्र, या आठवड्याभरात आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता आज रात्री उशिरापर्यंत काही निर्णय झाला नाही तर, उद्या सकाळपासून 15 हजारांहून अधिक परिचारिका काम बंद करतील. मग त्यानंतर जे होईल, त्याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा जेजेच्या परिचारिका आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्ष हेमा गाजबे यांनी दिला आहे. त्यामुळे उद्यापासून आरोग्यव्यवस्था कोलमडून कोरोनाची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात 20 ते 23 हजार कोरोना रुग्ण दिवसाला आढळत असताना आणि मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यात परिचारिका इतक्या मोठ्या संख्येने संपावर गेल्या तर, परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान आजही भर पावसात मुंबईतील जे जे रुग्णालयात सकाळी-सकाळी आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - ज्येष्ठ लेखिका आणि आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे अमेरिकेत निधन