मुंबई : अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी याप्रकरणी अधिक माहिती देताना पुढे सांगितले की, आम्ही या प्रकरणात समांतर तपास करत होतो. गुन्हे शाखेच्या जवळपास 8 टीम बनवण्यात आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. भांडुपमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी हा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आलेले आहे. या हल्ल्याचा उद्देश हा राजकीय आहे किंवा व्यवसायिक आहे का याचा तपास सुरू आहे. आरोपींकडून आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे, त्यानुसार तरी या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी सहभागी असल्याचे कळत आहे.
प्राथमिक तपास : अटक आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. या कटात आणखी काहीजण सहभागी आहेत का? याचाही तपास आम्ही करत आहोत. सध्या तरी प्राथमिक तपासात खरातच हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे समजत आहे. अजून तपास बाकी आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष अशोक खरात (५६) विरोधात भारतीय दंड संविधान कलम ३०७, ३२६ आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे भांडुप आणि डोंबिवली परिसरातील असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण : ३ मार्चला सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते यशवंत उर्फ संदीप सुधाकर देशपांडे हे शिवाजी पार्क मैदानाचे जॉगींग पार्कवर मॉर्निंग वॉक होते. त्यावेळी तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. देशपांडे गेट नंबर ५ च्या पुढे आले असता त्यांना क्रिकेट बॅट व स्टंपने मारहाण केली. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखा मुंबई शहर ही या गुन्हयाचा समांतर तपास करत होती.
भांडुप परिसरातून अटक : या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस सहआयुक्त, गुन्हे, लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, (प्रकटीकरण) गुन्हे शाखा प्रशांत कदम यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेची एकुण ८ पथके तयार करण्यात आली. त्यांना आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहीतीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून शनिवारी या गुन्हयात एकूण २ पुरुष आरोपी यांना भांडुप परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलीस अटक आरोपींकडे अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा : Dilip Joshi Threat : जेठालालच्या घराबाहेर 25 शस्त्रधारी.. जाणून घ्या काय आहे प्रकार