मुंबई : राज्यातील चित्र सध्या असे आहे की, त्यांच्या चाळीस आमदारांमधून तीन ते चार आमदार देखील निवडून येणार नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार अशा पद्धतीचे जनमत आपल्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे यांना 26 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली असल्याचा दावा जाहिरातीतून करण्यात आला आहे. असा जो दावा करण्यात आला आहे अतिशय हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये तसेच धुळफेकही करू नये, अशी विनंती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे.
काय म्हणते जाहिरात? मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1% लोकांनी पसंती दिली तर देवेंद्र फडणीस यांना 23.2% लोकांनी पसंती दिली आहे. शिंदे आणि फडणवीस जोडीला 49.3 पसंती दिली. भाजपला 30.2 टक्के तर शिवसेनेला 16.2 टक्के झुकते माप दिले. 46.40% जनता भाजप-शिवसेनेच्या युतीला पुन्हा सत्तेत आणण्याच्या बाजूने कौल दिला आहे.
शह देणे सुरू आहे का? 2014 आणि 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात नारा असायचा 'केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र'. मात्र, आजच्या जाहिरातीमधून राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशा प्रकारचा दावा केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे आणि भाजपतील मुख्यमंत्री पदावरील रस्सीखेच जाहिरातीच्या माध्यमातून समोर आली आहे. एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केले जात आहे का? अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.
शिंदेंना ही जाणीव झाली असावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील आज जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये पाहायला मिळाली. त्यात दावा करण्यात आला आहे की, राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणीव झाली आहे की, भाजप कोणाचाही मित्र होऊ शकत नाही. ज्या प्रकारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा वाद हा ठाण्यात निर्माण झाला, तशाच प्रकारचा वाद भाजप इतर लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी निर्माण करेल. भाजप स्वतःच्याच मित्राला गिळतो, अशाच पद्धतीचा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. याबाबतची जाणीव मुख्यमंत्री शिंदे यांना झाली असावी. म्हणून राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे अशा प्रकारची जाहिरात दिली असेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.
मविआला 53% प्रतिसाद : आजच्या जाहिरातीतून वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. शिवसेना-भाजप युतीला पुन्हा सत्तेत येण्याची कौल 49.3 टक्के लोकांनी दिला; मात्र 53.6 टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली असल्याचे जाहिरातीमधून स्पष्ट होत असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करावे लागेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना गिळंकृत केली. त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला गिळंकृत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
विरोधकांचा अजब दावा : शिवसेना-भाजप युतीला पुन्हा सत्तेत आणण्याच्या बाजूने 46.30 टक्के जनतेने कौल दिला असल्याचा दावा जाहिरातून केला गेला. तर 53.6 टक्के जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. जाहिरातीवरून राजकारणात दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधक करताय; मात्र हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर गंभीर दिसतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: