मुंबई : शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात दाखल होत आहेत. गेल्याच महिन्यात विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षप्रवेश केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरे गटात नाराज : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापूर्वीच सुरू झाल्या होत्या. शिंदे फडणवीस सरकारचे पहिले विधिमंडळ अधिवेशन काळातच सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरून लक्ष केले होते. त्यावेळी अनेक ठाकरे गटाच्या आमदारांनी नीलम गोऱ्हे आपल्याला सभागृहात बोलू देत नाही, अशा प्रकारची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांना खडेबोल सुनावल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नीलम गोऱ्हे नाराज असल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. उपसभापती असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यक्रमात नीलम गोऱ्हे दिसत होत्या.
शिवसेना पक्षाचा निष्ठावंत नेत्या : महाराष्ट्र विधिमंडळाच्या 55 वर्षानंतर विधान परिषद उपसभापती पदावर एका महिलेला स्थान मिळाले आहे. 2004 सालापासून आजपर्यंतच्या विधान परिषद सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे या कार्यरत आहेत. 2019 पासून त्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून काम पाहत आहेत. शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत नेत्या, शिवसेना पक्षाच्या प्रवक्ता म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची खंबीर बाजू नीलम गोऱ्हे यांनी लावून धरलेली होती.
नीलम गोऱ्हे पक्षाशी एकनिष्ठ : नीलम गोऱ्हे या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत एकनिष्ठ आहेत. त्या असा विचार करतील असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर थोड्याच वेळात नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटात जाणाने विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांची संख्या तीन झाली आहे. आगामी काळात ठाकरे गटातील कोणकोणते आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -