मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या मंगळवारी आमदारांचा एक गट फोडुन सुरत मार्गे गुवाहाटी गाठले. आणि बंडखोरी केली शिवसेनेसह अपक्ष आमदारांना त्यांनी आपल्या कळपात घेतले. त्या दिवसापासून रविवार पर्यंत त्यांच्या गटात सामिल होणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच होती. दरम्यान शिवसेनेने आवाहन करत त्यांना परत येण्यासाठी 24 तासाची मुदत दिली पण कोणीही वापस आले नाही. यातच शिवसेनेने एकनाथ शिंदे यांचे गट नेते पद रद्द करत दुसरा गटनेता नेमला. नंतर विधानपरिषद उपाध्यक्षांनी बंडखोरांना अपात्रतेची नोटीस पाठवली. याला शिंदे गटाने आव्हान दिले. महाविकास आघाडी, भाजप शिवसेनेच्या वेगवेगळ्या बैठकांचे सत्र सुरु झाले. शिवसेैनिक रस्त्यावर उतरले बंडखोरांच्या कार्यांलयांची तोडफोड तसेच दोन्ही बाजुनी निदर्शने आणि बंडखोरांना केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा अशा वेगवेगळ्या घटनांनी वातावरण तापलेले होते. आज त्यात अनेक घडामोडी पहायला मिळाल्या...
शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका: एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी बंडखोर आमदारांविरोधात जारी केलेल्या अपात्रतेच्या नोटिसला आव्हान दिले. या याचिकेत शिंदेंनी 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. दुसरी एक याचिका बंडखोर आमदारांनी, दाखल केलीयात शिवसेनेने विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून केलेल्या नियुक्तीला आव्हान देण्यात आले. शिंदे गटाने दावा केला आहे की, उपाध्यक्षांनी उचललेले पाऊल बेकायदेशीर आहे. कारण त्यांना केवळ विधानसभेतील घडामोडी बाबतच्या अपात्रतते बाबत निर्णय घेता येतो. पक्षाच्या बैठकी बाबत नाही. सरकार अल्पमतात आले. तसेच महाविकास आघाडीने सत्तेत राहण्यासाठी उपाध्यक्षांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप या गटाने केला.
बंडखोरांना दिलासा पुढील सुनावणी 11 जुलैला : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना वाद सर्वोच्च न्यायालयात चर्चिल्या गेला. न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासोबत शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरींना नोटीस बजावली आहे. आणि 5 दिवसांत आपली बाजू मांडत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जुलैला होणार असल्याने, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला आहे. त्यासोबत न्यायालयाने शिवसेनेचे बंडखोर 39 आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्तांची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे सूचना महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी काढली बंडखोर मंत्र्यांची खाती: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळात फेरबदल करून बंडखोर मंत्र्यांची खाती काढून अन्य मंत्र्यांकडे दिली आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपवल्याचे त्यांनी म्हटले आहे. यात एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादा भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, तर उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. राज्यमंत्र्यांकडील खात्याचा कारभारही त्यांनी उर्वरीत मंत्र्यांना वाटुन दिला आहे.
संजय राऊत यांना ईडीचे समन्स: या राजकीय घडामोडीत माध्यमासमोर शिवसेनेचा किल्ला सातत्याने लढवणारे संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तसेच 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे कळवले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहेत. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १ हजार ३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांवर आहे. यात मिळालेल्या पैशातून राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला आहे. मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहेत. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत राऊतांनी उत्तर दिले.
बंडखोर केसरकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे पत्र शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. तसेच या पत्रातून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाल्याचा त्यांनी केला आहे. राऊत हे शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारची पोलिसांना भेट, 25 लाखात देणार घर: राजकीय घडामोडी घडत असताना ठाकरे सरकारने मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पातील पोलिसांच्या घरांचा किमतीवरून विरोध झाल्यानंतर अखेर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलिसांना आता 25 लाख रुपयात घरे देण्यात येणार असून याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना आता 50 ऐवजी 25 लाख रुपयात कायमस्वरूपी घर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांनी आपली घरे लवकरात लवकर रिकामी करावी आणि प्रकल्प पुढे जाऊ द्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सागर बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग : शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांच्या हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत. गेल्या सहा दिवसांपासून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे सागर हे निवासस्थान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू बनले आहे. त्याच अनुषंगाने आज देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेते गिरीश महाजन,अशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राणा जगजीतसिंह पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह हे सर्व नेते उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर राज्यात होत असलेल्या नाट्यमय घडामोडीवर हे सर्व नेते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याशिवाय भाजपच्या पुढच्या वाटचालीसाठी चर्चा करण्यासाठी जमले आहेत.