मुंबई - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच कॅबिनेट बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची वेगळी बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तसेच अजित पवार यांच्या गटाचे नवीन कार्यालय मुंबईत सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही अजित पवार यांनी केले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवारांशी भेट - राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे सोपवला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी 5 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला हजर राहणार आहे. कार्यकर्ते तुमच्यासोबत असल्याची जाणीव मी शरद पवार यांना करुन दिली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
दोन्ही पवार गटांच्या 5 जुलैला बैठका - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाची 5 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. तसेच शरद पवार यांनीही 5 जुलै रोजीच आपल्या गटाची मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता किती आमदार व खासदार कोणत्या गटाकडे जाणार हे 5 जुले रौजीच स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन्ही नेत्यांनी बैठक बोलावल्याने नेत्यांची नेमकी विभागणी स्पष्टपणे कळणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक - अजित पवार आपल्या साथीदारांसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली आहे. याबैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यावेळी हजर होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकमेकांचे कट्टर विरोधक बैठकीत एकत्र - राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हल्लाबोल केला होता. मात्र, आज पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ या मंत्र्यांवर आली. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. मात्र आज त्यांच्यासोबत बैठकीला हे नेते एकत्र बसले होते.
नवीन कार्यालय सुरू, चावी हरवली - बंडखोरीनंतर अजित पवारांनी आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी आपल्या गटाचे नवीन कार्यालय मुंबईत आज सुरू केले. मात्र, या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला अजित पवार हे पोहोचल्यानंतर या कार्यालयाची चावी गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे अजित पवार यांना एक तास ताटकळावे लागले होते. अजित पवार यांनी उद्घाटन केलेले हे नवीन कार्यालय मंत्रालयाच्या शेजारीच आहे. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचे सांगितले आहे.
अनिल पाटील म्हणाले आम्हीच व्हिप बजावणार - राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी येणाऱ्या काळात पक्षातील आमदारांना व्हिप बजावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याने आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. अनिल पाटील म्हणाले की, मला प्रतोद असण्याचा अनुभव आहे. पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आणि गट नेत्यांच्या आदेशाने व्हिप बजावला जाईल. येणाऱ्या काळात तेच व्हिप लागू होणार आहे. सर्वच आमदार अजित पवारांचे नेतृत्व मान्य करत आहेत. व्हिप कोणी मोडेल असे मला वाटत नाही. आम्हीच राष्ट्रवादी आहोत त्यामुळे बंडखोरी म्हणण्याचा काही प्रश्नच येत नाही, असे अनिल पाटील यावेळी म्हणाले.
काँग्रेस, ठाकरे गटाची बैठक - राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस आणि ठाकरे गट सावध झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली. त्यावेळी आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित महाविकास आघाडीत राहून काम करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर दिली. तसेच ठाकरे गटानेही आज आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक घेतली. यावेळी आम्ही महाविकास आघाडीतच राहणार असल्याचे एकमत या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांचे झाले आहे.
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विरोधी पक्षांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळेच आज काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची वाय बी सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे.
फोटो वापरणाऱ्यांना शरद पवारांची तंबी - राज्यभरात पोस्टर लावताना शरद पवारांचा फोटो लावा, असे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर आज शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी माझे फोटो लावू नयेत, अशी तंबी शरद पवारांनी दिली आहे. त्याशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या कोणतेही नेत्याचा फोटो फ्लेक्सवर वापरायचा नाही, असे आदेश शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
अजित पवारांकडून पंतप्रधानांचे कौतुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतका दुसरा मोठा राष्ट्रीय नेता कुणीच नाही, त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही, असे वक्तव्य नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले होते. अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसह मंत्रालयात हजेरी लावली. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका - राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झाले ते किळसवाणे आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचे ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संताप व्यक्त केला आहे.
उपाध्यक्ष संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णयाचे पत्र पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहे.
हेही वाचा...