मुंबई - अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. अजित पवार यांच्या युतीतील सहभागामुळे शिवसेना तसेच भाजपमधील काही आमदार नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसे विधानेही दोन्ही पक्षातील काही आमदारांनी केली आहेत. या सर्व बाबींवर शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार ही केवळ चर्चा आणि अफवाच आहे. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही. तसेच शिवसेनेतील आमदार नाराज नाहीत - उदय सामंत, मंत्री
मुख्यमंत्रीपदाला धोका नाही - अजित पवार यांना भाजपने युतीत घेऊन एकनाथ शिंदे यांचा गेम करण्याचा प्लॅन केला आहे, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यालाच धरून उदय सामंत यांनी स्पष्टता दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ही केवळ अफवा असल्याचे सामंत यावेळी म्हणाले.
शिवसेनेत कुणीही नाराज नाही - अजित पवार यांच्या एन्ट्रीनंतर 9 मंत्रिपदे ही राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांच्या गटाला देण्यात आली आहेत. त्यामुळे आधीपासूनच बाशिंग बांधून बसलेल्या शिवसेना आणि भाजपमधील मंडळींचा मूड ऑफ झाल्याचे त्यांच्या मागील दोन दिवसातील विधानांमुळे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, शिवसेनेतील कोणीही आमदार नाराज नाहीत. संजय शिरसाट हे आमचे ज्येष्ठ नेते असून, ते नाराज नाहीत. बच्चू कडू यांच्याबाबतीत काही विषय असेल तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत बोलून दूर करतील. तसेच भरत गोगावले देखील नाराज नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
अजितदादा आल्याने फायदाच - अजित पवाह हे मुख्यमंत्री होणार ही केवळ चर्चा आहे. अजित पवार युतीत आल्याने आमची ताकद आणखी वाढली आहे. त्यांचा आम्हाला फायदाच होणार आहे. तसेच खातेवाटप लवकरच होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. मनसेने कोणासोबत जायचे हे मी नाही सांगू शकत, तो त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा अधिकार आहे. तसेच सत्तेत वाटेकरी वाढल्याने एखादे मंत्रिपद एकडे तिक़डे होऊ शकतात, असेही सामंत यावेळी म्हणाले.
हेही वाचा -
- Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी निवृत्त व्हावे का, पृथ्वीराज चव्हाणांसह लालूप्रसाद यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
- NCP Executive Meeting Today: दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक: शरद पवार बैठकीसाठी दाखल
- Maharashtra Political Crisis : नाशकात पुलोद पॅटर्नची अपेक्षा ; छगन भुजबळांना शह देण्यासाठी शरद पवार घेणार बैठक