मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपल्या बाजूने निकाल द्यावा यासाठी, भाजपसह एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाने देव पाण्यात ठेवले असतील. निकाल आपल्याविरोधात आला तर काय डाव खेळावेत याविषयी या दोन्ही गटांनी आपली रणनीती ठरवली असेल. पण राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर भाजपची काय तयारी असेल किंवा भाजप काय राजकीय खेळी खेळेल याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
राजकीय गणित जुळवणार : राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी निकाल आला आणि त्यात शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरविण्यात आले तर मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागेल. कारण या अपात्र आमदारांमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. यामुळे तेही अपात्र होतील, जर ते अपात्र झाले तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारमधील सहभागी घटक पक्षांना याची कल्पना आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने याबाबतची शक्यता डोक्यात घेऊन इतर गणित जुळवण्यासाठी तयारी केलेली आहे.
काय होण्याची शक्यता? : सरकारमधील शिंदे गट अपात्र ठरल्यास आधी 16 आमदार सत्ता पक्षातून कमी होतील. जर 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढचा निर्णय झाला तर सरकार कोसळणार हे नक्कीच. मात्र अशा स्थितीत सरकार वाचवण्यासाठी भाजपने आधीच रणनीती आखली आहे. जर ४० आमदार अपात्र ठरले तर सभागृहातील आमदारांची संख्या २४८ इतकी राहील. या २४८ आमदारांपैकी बहुमतासाठी १२५ आमदारांची संख्या आवश्यक असेल. हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत असलेले इतर पक्षातील ८ आमदार आणि १२ अपक्ष आमदारांचा पाठिंबा जर कायम राहिला तर भाजपाची सत्ता कायम राहील. म्हणजेच काय भाजपाला कोणतीच भीती नाही आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होईल.
आमदारांनासोबत ठेवण्यासाठी भाजपा लागली कामाला : अपक्ष आमदार आणि अन्य पक्षाचे आमदार सोबत राहावे, यासाठी भाजपाने प्रयत्न चालू केले आहेत. या आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी भाजपाने रणनीती तयार केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. अन्य पक्षातील आमदारही सोबत येतील का? याची चाचपणी करण्यात येत आहे.