मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, बंडखोरीनंतर अजित पवारांनी आम्हीच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला असला, तरी आपल्या गटाचे नवीन कार्यालय थाटले आहे. मात्र, या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाला अजित पवार हे पोहोचल्यानंतर या कार्यालयाची चावी गहाळ झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यामुळे अजित पवार यांना एक तास ताटकळावे लागले होते. नंतर चावी सापडल्यानंतर अजित पवार यांनी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे.
आमचाच पक्ष खरा राष्ट्रवादी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडखोरीनंतर अजित पवार यांनी आपली नवीन चूल मांडली आहे. मात्र आपण खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. मात्र आपणच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांनी नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडीला उधाण आले आहे.
कुठे आहे अजित पवार यांचे नवीन कार्यालय : अजित पवार यांनी नवीन कार्यालय स्थापले असून आता अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांनी उद्घाटन केलेले हे नवीन कार्यालय मंत्रालयाच्या शेजारीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश असे ठळकपणे लिहिलेले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या कार्यालयात त्यांच्या गटाच्या नेत्यांचा मुक्काम असणार आहे.
कार्यालयाची चावी झाली गायब : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या शेजारीच आपले नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. मात्र या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आपल्या समर्थकांसह आले असता, या कार्यालयाची चावी गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अजित पवार यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले. ही चावी उबाठा गटाच्या कार्यकर्त्याने गहाळ केल्याची चर्चा या परिसरात सुरू होती.
चावी मिळेना, कार्यकर्त्यांकडून आरोप : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच अशा प्रकारचे दावे दोन्ही गटाकडून केले जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवार त्यांच्या गटाच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे प्रतापगड या ठिकाणी 12 वाजेच्या सुमारास उद्घाटन होणार होते. मंत्रालयासमोरील प्रतापगड बंगल्यात पक्ष कार्यलय सुरू होणार आहे. मात्र 11 वाजले तरी प्रतापगड बंगल्याचे मुख्यद्वार उघडले गेले नव्हते. बांधकाम विभाग आणि कार्यकर्ता यांच्यात संवाद झाला नाही आणि बाहेर पाऊस पडत होता. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील झाली होती. त्यामुळे पावसापासून बचावासाठी सर्वजण ताटकळले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चावीची वाट न पाहता दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. बेकायदेशीर रित्या प्रतापगड हा बंगला कोणाच्या ताब्यात होता, याविषयीची आम्ही चौकशी मागणी करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा -