मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. तेव्हाच अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊनच भाजपाने सत्तेत सहभागी केल्याची चर्चा रंगली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर अजित पवार यांचा उल्लेख 'जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले बॅनर दिसले आणि आता अजित पवार नक्की मुख्यमंत्री होणार, हा दावा त्यांचे समर्थक पैजेवर करायला लागले. त्यातच भर पडली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची!
अजित पवार होणार मुख्यमंत्री ? : राष्ट्रवादीचे खमके नेता अजित पवार यांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वितुष्ट आल्याच्या चर्चाही रंगल्या. अजित पवार यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या घटनाक्रमात अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची भर पडली. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनीही 'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की' असे ट्विट करत 'अजितपर्व' सुरु झाल्याचा दावा परस्पर करुन टाकला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत : दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या दिल्लीवारीमुळे तर्क वितर्कांना उत आला. पंतप्रधानांबरोबर भेटीनंतर, आपल्या कुटुंबातल्या चार पिढ्यांच्या सदस्यांनी त्यांची केवळ सदिच्छा भेट घेतली. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना माध्यम प्रतिनिधींसमोर द्यावे लागले.
नागालँडचे आमदार अजित पवारांसोबत : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्षातल्या बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या मोजक्या आमदारांपैकी काही अजित पवारांच्या तंबूत दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांचे पारडे जड होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील सात आमदारांनीही अजित पवार यांनाच साथ दिली आहे.
हेही वाचा -
Ajit pawar Birthday : साखर कारखान्याचा संचालक ते उपमुख्यमंत्री अजित दादांचा प्रवास