मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात गेली काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Live Updates-
- नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.
- ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे. सगळी जनता हतबल आहे. जनतेचा सरकारवर भरोसा राहिला नाही. टोलचे रस्ते खराब असतील तर ते टोलमुक्त व्हावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
- शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ऑक्टोंबर २०२३ शेवटपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती केली जाणार आहे.
- महाराष्ट्र पोलिसात कंत्राटी भरती करणार असा निर्णय घेण्यात आल्याचे समजले. मला विचारायचे आहे की तुमच डोके फिरले आहे का? ज्या पद्धतीने बदल्या करत आहात, पैसे घेऊन बदल्या करत आहात, आता त्यात भर म्हणून कंत्राटी पद्धत आहे. उद्या तुम्ही सीबीआय, ईडीमध्येही कंत्राटी भरती करणार आहात का, असा सवाल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला आहे.
- उद्धव ठाकरेंना मच्छर घाबरत नाही. हिंमत असेल मर्द असेल तर उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांच्या ऐवजी मला घेऊ द्या. मग आवाज कोणाचा आणि कोठून येते ते पाहू, असे आव्हान नितेश ठाकरे यांनी दिले आहे.
- सरकार विरोधात विरोधकांनी पायऱ्यावर आंदोलन केले. भ्रष्टाचार सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचा धिक्कार असो, असे फलक हाती घेत आंदोलन केले आहे.
- उद्धव ठाकरेंनी फक्त स्वत:चे कुटुंब सांभाळले. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. आमचे कुटुंब प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे राणे म्हणाले.
व्हिडीओ कॉन्फरन्सची वेळ पुढे ढकलली- राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात निवेदन केले. मात्र, आज आरएसएसचे सह कार्यवाह मदनदेवी दास यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार असल्याने अजित पवार पुण्याला रवाना झाले.
असा दिला निधी- गतवर्षी अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुर्भाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरता 8 हजार 677 कोटी देण्यात आले तर यंदा मार्च , एप्रिल महिन्यात झालेल्या अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 513 कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे पवार यांनी सांगितले. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 1500 कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला असून डीबीटी प्रणालीमार्फत 600 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीमध्ये मंजूर केले असून तसदर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
प्रशासनाला दिले निर्देश- धोकादायक परिस्थितीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने देण्यात येणार आहे. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. पुराने बाधित झालेल्या कुटूबाना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पुरामूळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे, त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-