मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रकरणात कन्नड रक्षण वेदिके संघटनेने केलेल्या वाहनांच्या तोडफोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आज यशवंत चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारणीची बैठक होणार आहे. बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक प्रश्नांवर पवार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोधक आक्रमक: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटला. कर्नाटककडून सतत वादग्रस्त विधाने होऊ लागल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने समन्वातून मार्ग काढण्याचे स्पष्ट करत, 6 डिसेंबरला कर्नाटक दौऱ्याचे नियोजन केले होते. सीमा भागात न येण्याची धमकी थेट मंत्र्यांना दिली. कर्नाटकच्या धमकीनंतर राज्य सरकारने दौरा गुंडाळला. अशातच कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. विरोधी पक्षांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
पवारांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेत, 48 तासांत हल्ले थांबवा नाहीतर कर्नाटकात येऊ, असा थेट इशारा कर्नाटकला दिला होता. आज ही वेळ संपणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक होणार आहे. अजित पवार, जंयत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार असून यात कर्नाटक सीमावादावर नवी भूमिका काय मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.