मुंबई - राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग 23 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी 17 नोव्हेंबर पासून राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेशी संबंधित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे.
राज्यात 24 जूनपासून पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. परंतु राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
कोविड आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचे आणि त्यासाठीच या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर या दरम्यान कोविड-१९साठीची आरटी पीसीआर (RTPCR) चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. शाळा व्यवस्थापनाने त्याची पडताळणी करावी आणि त्यानंतरच त्यांना शाळांमध्ये प्रवेश द्यावे, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास...
मंगळवारपासून सुरू होत असलेल्या कोविडच्या चाचणीनंतर ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना शाळा आणि परिसरात येण्यास मज्जाव केला जाणार आहे. तसेच त्यांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहण्याची मुभा दिली जाणार आहे. यासाठी सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी शाळा मुख्यध्यापकांवर सोपवण्यात आली आहे.
चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्यास...
ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असतील, त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. शिवाय अहवाल आल्यानंतर शिक्षकांना कोविड-१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी पुन्हा त्वरित चाचणी करावी, असेही या मार्गदर्शक सूचनांमधे म्हटले आहे
हेही वाचा - कोरोना दबा धरुन आहेच, देवदर्शन घेताना काळजी घ्या - संजय राऊत
हेही वाचा - सिरीयल किलर रामन राघव याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू