मुंबई : आळंदी येथे वारकऱ्यांवर नुकताच लाठीचार्ज झाला होता, यामुळे वारकरी बांधवात मोठा रोष आहे. काही वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पांडुरंगाच्या पूजेचा देखील विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वारीच्या कालावधीत सर्व वारकऱ्यांना विम्याचे कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत केली.
विठ्ठल रुक्मिणी वारकरी छत्र योजना : विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने आता विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विम्याचे कवच मिळणार आहे. वारीच्या तीस दिवसांच्या कालावधी दरम्यान हा विमा लागू राहणार आहे.
कशी असणार विमा योजना? : वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. एखाद्या दुर्घटनेत वारकऱ्याला कायमचे अपंगत्व किंवा विकलांगत्व आल्यास एक लाख रुपये देण्यात येतील. दुर्घटनेत अंशत: अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वारीच्या दरम्यान वारकरी आजारी पडल्यास त्याला औषधोपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतचा खर्च देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, ही मदत आणि विमा योजना, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी योजना : वारीदरम्यान उन्हाच्या किंवा पावसाच्या त्रासामुळे दुर्घटना होतात. तसेच वारकरी विविध कारणांमुळे आजारी पडतात. अशा परिस्थितीत वारकऱ्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांना योग्य वेळेत मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. वारकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांना संरक्षण मिळावे, हा या योजनेचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा :