मुंबई : Maharashtra Drought : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, दुबार पेरणी केलेले पीकही हाताशी लागण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत पुन्हा एकदा दुष्काळाचा सामना (Drought in Maharashtra) शेतकऱ्याला करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जर अशा पद्धतीने पावसाचे प्रमाण कमीच राहिले अथवा खूप जास्त झाले तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, सरकारच्या वतीने राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी दिली आहे.
विविध पिकांचा घेणार आढावा : राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नवीन धोरण आखण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कशाप्रकारे अधिकाधिक मदत करता येईल यासाठी हे धोरण असणार आहे. या संदर्भात राज्याचे कृषी खाते आणि पुनर्वसन मदत खाते हे एकत्रपणे अहवाल तयार करीत आहेत. राज्यातल्या विविध पिकांचा आणि नुकसानीचा संपूर्ण आढावा घेऊन कशाप्रकारे जास्तीत जास्त मदत देता येईल, याबाबतचा अहवाल तयार करण्यात येत आहे. या अहवालानंतर हे धोरण ठरवले जाईल. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांना स्थायी आदेशाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इर्शाळवाडी पुनर्वसनाला वेग : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ( Irshalgad Landslide ) मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत दिली आहे. तसेच या ठिकाणी ज्या व्यक्ती सापडल्या नाहीत त्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारने मदत देऊ केली असून, त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. तसेच येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चिती केली आहे. या जागेला येथील नागरिकांनी मान्यता दिली असल्यामुळे, या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून घरांची निर्मिती केली जात आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि गावकरी यांच्या संमतीने या ठिकाणी पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मदतीचे निकष बदलण्यासाठी केंद्राला विनंती : केंद्र सरकारकडून 2016 मध्ये कृषी मंत्रालयाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे निकष ठरवण्यात आले आहेत. मात्र कित्येकदा शेतकऱ्यांचे नुकसान दिसत असले तरी, केवळ निकषात बसत नाही म्हणून इच्छाशक्ती असूनही, शेतकऱ्यांना मदत देता येत नाही. अशी कबुली अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना आताच्या निकषांमध्ये बदल करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी, केंद्र सरकारकडे कृषी विभाग आणि मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विनंती करत आहोत. असे मंत्री अनिल पाटील (Anil Patil ) यांनी सांगितले.
राज्याचे मदतीचे धोरण : लवकरच केंद्रीय कृषिमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री तोमर यांना याबाबत विनंती करून देशातील निकष बदलण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Narayanan Sitharaman ) यांच्याशी चर्चा करून, राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने केंद्राकडून जास्तीत जास्त मदत व्हावी. तसेच यासाठी केंद्रीय पुनर्वसन आणि मदत मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन, त्यांना सुद्धा अहवाल देणार आहे. त्याचबरोबर राज्याचे मदतीचे धोरण ठरणार आहे. त्याची माहिती केंद्राला देणार असल्याचे, अनिल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील लोकांच्या दुःखात बीआरएस त्यांच्या सोबत-बाळासाहेब सानप
- Maharashtra Political Crisis: मंत्र्यांच्या स्वागतासाठी भर रस्त्यावर विद्यार्थ्यांना उभे करण्यात आल्याचा प्रकार, मंत्री म्हणतात... याबद्दल काहीही कल्पना नाही
- Maharashtra Political Crisis : आम्हीच राष्ट्रवादी पक्ष, व्हिपही आम्हीच बजावणार - अनिल पाटील