मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112 तर आज 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
6281 नवीन रुग्ण -
आज राज्यात 6281 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 93 हजार 913 वर पोहचला आहे. तर आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.16 टक्के तर मृत्यूदर 2.47 टक्के आहे. राज्यात आज 2567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 92 हजार 530 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 नमुन्यांपैकी 20 लाख 93 हजार 913 नमुने म्हणजेच 13.38 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 28 हजार 060 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 48 हजार 439 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण संख्या वाढली -
राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112 तर आज 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात रात्रीच्या संचारबंदीचा विचार सुरू -
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने काही विभागात रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेवट्टीवर यांनी दिली. तर मुंबईत नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नाईलाजाने मुंबईत टाळेबंदी लावावी लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
आज या विभागात सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई पालिका - 897
- ठाणे पालिका - 147
- नवी मुंबई पालिका - 116
- कल्याण डोंबिवली पालिका - 145
- नाशिक पालिका - 189
- अहमदनगर - 100
- पुणे - 228
- पुणे पालिका - 430
- पिंपरी चिंचवड पालिका - 189
- औरंगाबाद पालिका - 160
- अकोला पालिका - 267
- अमरावती - 249
- अमरावती पालिका - 806
- यवतमाळ - 92
- बुलढाणा - 139
- नागपूर - 169
- नागपूर पालिका - 548
- वर्धा - 112