मुंबई - कोविडच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर 15 दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र केंद्र सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.
आरटीपीसीआरमधून सूट
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोविड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे. इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ 48 तासांवरून वाढवून 72 तास इतका करण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.
दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करा
मागील दोन महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आज अनेक नागरिक विनातिकिट प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा लोकल प्रवासात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक खासगी वाहनातून प्रवास करत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. या खर्चाची बचत होण्यासाठी लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्याने लोकल प्रवास खुला करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड
'ब्रेक द चेन' अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने अनेक नागरिक आता कार्यलय जाणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगोदरच पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे कमी पगार असणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च ही पेलवेना झाला आहे. कारण, मुंबईत कामाला येणारे अनेक नागरिक कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून येतात. मात्र, इंधन दरवाढीमुळे रस्ते मार्गाने मुंबई गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा - पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्या, अन्यथा भजन आंदोलन करणार
हेही वाचा - राज्यातील 5 हजार 947 शाळांमध्ये वाजली घंटा