मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ७७.१० टक्के लागला आहे. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९० टक्केपेक्षा जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८,५१६ इतकी आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना maharashtraeducation.com, mahresult.nic.in आणि mahasscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. तसेच निकालाची प्रतही संकेतस्थळावरून मिळवता येणार आहे.
या परीक्षेसाठी राज्यातील ९ विभागीय मंडळातून १६ लाख ३९ हजार ८६२ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ८८. ३८ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के लागला आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनी या बाजी मारल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी ८२.८२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ७२.१८ टक्के आहे. यंदाच्या वर्षी निकालाची टक्केवारी घटलेली आहे. मार्च २०१९ चा निकाल हा मार्च २०१८ च्या तुलनेत १२.३१ टक्क्यांनी कमी आहे.
निकालाची विभागवार टक्केवारी
- पुणे - ८२.४८ टक्के
- नागपूर - ६७.२७ टक्के
- औरंगाबाद - ७५.२० टक्के
- मुंबई - ७७.०४ टक्के
- कोल्हापूर - ८६.५८ टक्के
- अमरावती - ७१.९८ टक्के
- नाशिक - ७७.५८ टक्के
- लातूर - ७२.८७ टक्के
- कोकण - ८८.३८ टक्के