मुंबई Maharashtra ATS : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं (ATS) बुधवारी (१३ डिसेंबर) ठाण्यात मोठी कारवाई केली. एटीएसनं देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याबद्दल एका २३ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. गौरव पाटील असं या तरुणाचं नाव असून तो नेव्हल डॉक येथे शिकाऊ उमेदवार म्हणून काम करतो.
चार जणांवर गुन्हा दाखल : आरोपी तरुण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या एजंटच्या संपर्कात होता. या प्रकरणी एटीएसनं चार जणांवर गुन्हा दाखल केलाय. इतर तीन लोक गौरव पाटीलच्या संपर्कात होते, असं एटीएसनं सांगितलं. गौरव पाटील यानं आयटीआय कोर्स केला असून त्यानंतर त्याला नेव्हल डॉकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यांसाठी काम मिळालं. दरम्यान, ही घटना उघडकीस आली आहे.
ठाण्यातून अटक : संशयित तिघांपैकी दोन जण पाकिस्तानी असून एक पश्चिम बंगालचा आहे. गौरव पाटील याचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला होता. प्रशिक्षण घेत असताना त्यानं पश्चिम बंगालमधील संशयित आरोपीकडून पैसे घेऊन त्या बदल्यात पाकिस्तानी एजंटला भारताची गुप्त माहिती पुरवल्याचं एटीएसला समजलं. त्यानंतर आज ठाण्यातून त्याला अटक करण्यात आली.
पैशाच्या मोबदल्यात महिती पुरवली : दहशतवाद विरोधी पथकानं या तरुणाची चौकशी केली. चौकशीदरम्यान अनेक खुलासे झाले. या तरुणाची एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून दोन PIO एजंटशी ओळख झाली होती. त्यानं या दोघांना सोशल मीडियावरून भारत सरकारनं प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवल्याचं उघड झालं. या बदल्यात त्यानं या दोघांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचंही निष्पन्न झालं आहे.
हे वाचलंत का :