मुंबई Mahaparinirvan Din 2023 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना मानणारे अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून दादरच्या चैत्यभूमी इथं दाखल झाले आहेत. यावेळी राज्य शासनाच्यावतीनंही बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं बाबासाहेबांचे अनुयायी मुंबईत दाखल झाल्यानं दादरच्या चैत्यभूमीवर जनसागर दिसून येतोय.
अनुयायांसाठी अनेक सुविधा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयायांचा जनसागर दादर इथं लोटला आहे. त्यांच्या सुविधांसाठी महापालिका प्रशासनानं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, राजगृह यासह आवश्यक ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनुयायांसाठी तात्पुरते निवारा कक्ष दादरच्या शिवाजी पार्क इथं उभारण्यात आलंय. त्यासोबतच व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, स्थानगृह, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा आणि अग्निशमन यंत्रणा दादरच्या चैत्यभूमी इथं तैनात करण्यात आलीय. नवजात बालकांसह येणाऱ्या महिलांकरिता चैत्यभूमी तसंच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्षाची सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून करुन देण्यात आलीय. त्यामुळं यावर्षी मातांची गैरसोय टळणार आहे.
कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण : महापालिकेकडून चैत्यभूमीतील आदरांजली कार्यक्रमाचं मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसंच, समाज माध्यमांद्वारेदेखील नागरिकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहेत, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिलीय. तसंच, उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितलं की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या विश्रांतीसाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा शामियाना उभारण्यात आलाय. तसंच तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून महानगरपालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्येदेखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथंही तात्पुरत्या निवाऱ्यांसह पुरेशा संख्येनं फिरती शौचालयं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसंच दादर रेल्वे स्थानकाजवळ, एफ उत्तर विभाग चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथील स्वामीनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतील.
हेही वाचा :