मुंबई - सीएए(नागरिकत्व सुधारणा कायदा), एनआरसी(राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) आणि एनपीआर(राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात सामान्य नागरिक, सामाजिक संघटना, मुस्लीम संघटना, राजकीय संघटना आणि कलाकारांनी सहभाग घेतला.
केंद्र सरकारने केलेले कायदे समाजावर अन्याय करणारे आहेत. संविधानविरोधी कायद्यांचा विरोध करून संविधान वाचवण्याची गरज असल्याची भूमिका या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी मांडली. मुंबई पोलिसांनी या महा मोर्चासाठी मोठया प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - नाणार रिफायनरीची जाहिरात चक्क 'सामना'त; शिवसेनेची भूमिका बदलली?
या महामोर्चात कलाकार सुशांत सिंग, अनुराग कश्यप, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, मौलवी, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून जोपर्यंत हे कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत असाच लढा चालू ठेवू, असे प्रतिपादन केले.
काही दिवसांपूर्वी याच आझाद मैदानात पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने महामोर्चा काढला होता. सीएए, एनआरसी आणि एनपीआरला पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात या कायद्यांविरोधात मोर्चा काढला, अशी चर्चा आहे.