मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्तिथीत नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित 'महाजानदेश यात्रे'चा समारोप होणार आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजानदेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. तर 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महाजनादेश यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार : गणेश नाईकांचा 48 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या व दुस-या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक, महिला आणि अल्पसंख्यांकांशी संवाद साधला. 2 टप्प्यात झालेली महाजनादेश यात्रा राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून पार पडली. सरकारच्या 5 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा - हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये येतील म्हणून मागील पाच वर्षांपासून आम्ही डोळे लावून बसलो होतो - मुख्यमंत्री
अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या प्रमुख उपस्तिथीत या महाजानदेश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. तर सोलापूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप करण्यात आला होता.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 528 किमी प्रवास करणार आहे. गुरूवारी 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सभेत पंतप्रधान महाराष्ट्रासाठी कोणती मोठी घोषणा करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.