मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मित्रपक्षांना एकही जागा दिलेली नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगाल्यावर महादेव जानकर, रिपाइंचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक पार पडली. यावेळी घटकपक्षांवर अन्याय होणार नाही. त्यांना योग्य तो सन्मान आणि भागीदारी दिली जाईल. मात्र, विधानसभेत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.
भाजपच्या तिकीटावर बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महादेव जानकर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे जानकर म्हणाले. तसेच कांचन कुल आजपासून भाजपमध्ये असतील आणि मित्रपक्ष म्हणून त्यांच्या प्रचाराला जाणार असल्याचे दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
कोल्हापूरमधील प्रचारसभेच्या महामेळाव्यात घटकपक्षही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत उपस्थित होते.