मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी वित्त विभागाने प्रसिद्ध केला आहे. १ जानेवारी ते ३० जून २०१९ दरम्यानचा महागाई भत्ता जानेवारीच्या पगारात रोखीने देण्यात येणार आहे.
३ टक्के वाढ -
महागाई वाढते त्याप्रमाणात कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ९ टक्के महागाई भत्ता दिला जात होता. १ जानेवारी २०१९ पासून हा महागाई भत्ता १२ टक्के करण्यात आला. शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ जानेवारी ते ३० जून २०१९ दरम्यानचा वाढीव ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी जानेवारी महिन्याच्या पगारासोबत दिली जाणार आहे.
१ जुलै २०१९ पासून महागाई भत्त्याची वाढीव रक्कम रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची थकबाकी देण्यासाठी वेगळा आदेश काढण्यात येणार आहे, असे शासन निर्णयात महटले आहे. वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजित गोरे यांच्या सहिने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.