मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची नेत्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. न्यायालयाचे पुरावे न देता राजकीय हेतूने लोक आरोप करत असल्याचे भंडारी म्हणाले. पवारसाहेब स्वतः खासदार आहेत. तर मग त्यांनी आत्तापर्यंत संसदेत का चौकशीची मागणी केली नाही? असा सवाल माधव भंडारींनी केला.
ज्या कबीर कला मंचाच्या सुधीर ढवळे यांना शरद पवार निर्दोष म्हणतात त्याच कबिर कला मंचावर तेव्हाचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कारवाई केली होती. याबद्दल पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काहीच बोलत नसल्याचे भंडारी म्हणाले. त्यावेळी तुमचे सरकार कबीर कला मंचवर बंदी घालत होते. त्यामुळे आता कबीर कला मंचा बाबातची भूमिका बदलण्याचे नेमके कारण काय? असा सवालही भंडारी यांनी यावेळी केला.
आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला याचा अर्थ तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर आणि राष्ट्रीय तपास यंत्रणावर विश्वास नाही का? आतापर्यंत समोर न आलेले चेहरे समोर येतील याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळेच ते समोर न आलेले चेहरे कोण? हे चेहरे समोर यायला हवेत अशी आमची मागणी असल्याचे भंडारी म्हणाले. ज्या पद्धतीची विधाने पवारसाहेब आणि त्यांच्या नेत्यांकडून येत आहेत, त्यावरून त्यांची दुटप्पी भूमिका असल्याचे दिसत असल्याचे भंडारी म्हणाले.