मुंबई - मुंबईतील अनेक वसाहतीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. यावर बुधवारी स्थायी समितीत पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाच्या निषेधार्थ झटपट सभा तहकुबी मांडली व त्याला भाजप वगळता इतर पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत आपल्या विभागातील पाणी समस्येचा पाढा वाचला. पाणीसाठा असूनही पाणी पुरवठा नीट केला जात नसल्याने त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तसेच यावेळी माझ्याही घरातही सात दिवस पाणी योग्य प्रमाणात येत नसल्याची तक्रार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली.
प्रशासन गांभिर्याने घेत नाही -
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पुरेसा पाणीसाठा असतानाही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी त्यांच्या १७६ प्रभागात नागरिकांच्या पाणी समस्येवर असलेल्या तक्रारी मांडल्या. प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही गांभिर्यांने घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. मुंबईतील अनेक विभागात पाणी टंचाईवर नागरिकांच्या तक्रारी आहेत. याचे उत्तर नगरसेवकांना द्यावे लागत आहे. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षीची ही समस्या कायम असून ती सोडवण्यासाठी प्रशासन गांभिर्याने घेत नाही. प्रशासनाच्या निषेधार्थ रवी राजा यांनी झटपट सभा तहकुबी मांडली. भाजप वगळता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष़्ट्रवादी तसेच समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील पाण्याची समस्या मांडत सभा तहकुबीला पाठिंबा देत प्रशासनाला धारेवर धरले.
स्थायी समिती अध्यक्षांच्या घरातही पाणी नाही -
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागातही नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या घरातही सात दिवस पाणी नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पाणी समस्या निर्माण होत असून गेले सात दिवस लवकर उठून पाणी भरावे लागत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
पाणी टंचाई दूर करण्याबाबत आयुक्तांचे आश्वासन -
स्थायी समितीत पाणी टंचाईबाबत नगसेवकांनी मांडलेल्या तक्रारी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी गांभिर्याने घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरेसे आहे. मात्र, वितरण व्यवस्था नीट नसल्याची कबुली त्यांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी केली जाईल. तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईल, याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा - वांद्रे- कुर्ला संकुलातील जम्बो कोविड लसीकरण केंद्राला महापौरांची भेट