मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. प्रत्येक युनिट कमांडर यांना सूचना देण्यात आल्या आहेत. काही अलर्ट आमच्याकडे आहेत, गरज पडल्यास करवाई करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड व औरंगाबाद परिक्षेत्राचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे औरंगाबादेत आले होते. आज सकाळपासून त्यांनी नांदेड आणि औरंगाबाद परिक्षेत्रातील ८ जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला गालबोट न लागता निवडणूक कशी पार पडेल, यावर चर्चा झाली.
बैठकीनंतर जयस्वाल यांनी पत्रकारांशी संवाद साधत पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आणि अलर्ट आहेत, असा विश्वास व्यक्त करत युद्ध पातळीवर काम करावे लागणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर देखील आमची नजर आहे. पुरावा मिळाल्यास कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.यावेळी दहशतवाद आणि शहरी नक्षलवाद या विषयावर प्रश्न विचारले असता जयस्वाल यांनी बोलणे टाळले.