मुंबई - वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळेराज्यात सध्या १ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे थोड्या प्रमाणात का होईना कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे हे लॉकडाऊन अजून पंधरा दिवस वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्येत वाढ
मुंबईत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर मुख्यमंत्री अभ्यास करून निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
पुन्हा एकदा पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन
राज्यात 22 एप्रिल ते 1 मे कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे 2 मे ते 16 मे असे पुढील पंधरा दिवस राज्यभरात कडक लॉकडाऊन असणार आहे. या पंधरा दिवसात लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती अजून सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य सरकारला आहे.