मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे तोपर्यंत विमानवाहतूकही ठप्पच राहणार आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी पुढच्या तारखांचे आरक्षण करण्याचे प्रवाशांना सांगण्यात आले.
सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. या दरम्यान, एअर इंडिया वगळता इतर खासगी विमानवाहतूक कंपन्यांनी १४ एप्रिलनंतरचे तिकीट आरक्षण सुरू केले होते. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती बघता ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. परिणामी, प्रवाशांनी आरक्षित केलेली तिकिटे रद्द करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विमान कंपन्यांनी रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम परत करण्यास नकार दिला आहे.
'सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशन'ने या प्रकरणी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने विमानवाहतूक कंपन्यांना तिकीटविक्री संबधी फटकरावे, तसेच आगामी सूचना मिळेपर्यंत तिकीटविक्री न करण्याचे आदेश द्यावेत, असे सेंटर फॉर एशिया पॅसिफिक एव्हिएशनने सांगितले आहे.