मुंबई - कोरोनाच्या धोक्यामुळे भारतासह जगातील बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे सर्वजण घरीच आहेत. सद्या मुंबईत ना ध्वनी प्रदुषण आहे ना वायू प्रदुषण. अशा या वातावरणात दुर्मिळ पक्षी पाहायला मिळत आहेत. सद्या पक्षी खऱ्या अर्थाने आपले आयुष्य जगत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबई आडवी-उभी पसरलेली मेट्री सिटी. येथे सतत वर्दळ, गोंगाट, वाहनाचा आवाज, धूर, प्रदूषण. यामुळे मुंबईत चिमणी, पोपट, फुलपाखरू दिसणे ही दुर्मिळ झाले आहे. अशात दुर्मिळ पक्षी मुंबईत दिसण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. पण मागील पंधरा दिवसात मात्र हे चित्र बदलले आहे. त्यामुळेच कधी नव्हे तो रस्त्यावर मोर ही पिसारा फुलवून नाचताना दिसला. तर आता अतिशय दुर्मिळ पक्षी मुंबईत दिसु लागल्याची माहिती पक्षीप्रेमी आणि स्पॅरो शेल्टर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी दिली आहे.
चिमण्या-पोपट तर आता दिसू लागले आहेतच पण माणसापासून दूर रहाणारे मॅगपाय रॉबिन अर्थात दयाळ पक्षी, कॉपर स्मिथ बार्बेट अर्थात तांबट पक्षी, टेलर बर्ड असे पक्षी ही दिसू लागल्याचे माने यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात पक्ष्यांना अन्न मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. पण माने यांनी मात्र त्यांची अन्नसाखळी लक्षात घेता त्यांना खऱ्या अर्थाने आता अन्न, निसर्ग आणि हवा मिळत आहे. त्यामुळे ते मुक्तसंचार करत असून ते आपल्याला दिसत आहेत. आता फक्त जंतूनाशकाच्या अधिक वापरामुळे कीटक कमी होऊन त्यांना अन्न कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गार्डन, टेरेस आणि घराबाहेर कीटकनाशके कमी वापरा, असे आवाहन आम्ही सोशल मीडिाययातून करत असल्याचेही, माने यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात पक्ष्यांना पाणी आणि धान्य गॅलरी, टेरेस आणि अंगणात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे, माने यांनी सांगितले. दरम्यान लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबई पूर्वपदावर येईल आणि आता दिसू लागलेले हे पक्षी पुन्हा पाहायला मिळणार नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा - COVID-19: शेती, मत्स्योत्पादन प्रभावित... शेतकरी, फळ विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले
हेही वाचा - #लाॅकडाऊन: वाहतूक ठप्प..! राज्यातील वाहनचालकांवर उपासमारीची वेळ