मुंबई - घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात रेल्वे बोर्डाने पश्चिम आणि मध्य लोकल सेवा उद्यापासून महिलांसाठी सुरू होणार नाही, असा निर्णय घेतला. एका दिवशी लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असे रेल्वेकडून सांगितल्याने महिला प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
लोकल सेवा सुरू करावी, अशी विनंती राज्य सरकारने पत्राने केली. मात्र, लगेच लोकल सुरू करता येणार नाही. रेल्वे बोर्डासमोर प्रस्ताव ठेवला आहे. तसेच लोकल सेवा वाढवण्यास काही यंत्रणा, कर्मचारी वाढवावे लागतील. ही सेवा लगेच एका दिवशी सुरू करणे शक्य नाही, तसे पत्राद्वारे राज्य सरकारलाही कळवल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारमधील वाद चव्हाट्यावर
रेल्वे बोर्डाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत रेल्वे बोर्ड निर्णय घेत नाही, तोपर्यंत महिलांना लोकलने प्रवास करता येणार नाही. यामुळे लोकल प्रवासासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांचा हिरमोड झाला आहे. यावरून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले रेल्वे बोर्ड व राज्य सरकार यांच्यात असलेला वाद पुन्हा समोर आला आहे.
असा मिळाला असता महिलांना प्रवेश
राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात पत्रक काढले होते. तसेच हे पत्रक रेल्वे विभागाला पाठवण्यात आले. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली. पत्रात दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली. सकाळी मात्र लोकलमध्ये महिला प्रवास करता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले होते. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल, असेही सांगण्यात आले होते.