मुंबई - स्वच्छ आणि पोषक आहाराची हमी देण्यासाठी आता खाद्य पुरवठा करणाऱ्या प्रत्येकाला परवाना घेणे आता बंधनकारक आहे. ऑनलाईन डिलीव्हरी करणाऱयांपासून ते डबेवाले, किराणा दुकानदारापर्यंत सगळ्यांना अन्न सुरक्षित नोंदणी परवाना घ्यावा लागणार आहे. त्यांच्यावर आता अन्न आणि औषधी प्रशासनाची नजर असणार आहे. ग्राहकांपर्यंत उत्कृष्ठ प्रतीचे खाद्य पदार्थ जावेत म्हणून हा नियम करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ पुरवठा करणाऱ्यांच्या विरोधात ग्राहकांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा अस्वच्छतेचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषधी प्रशासनाने या सर्वांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार खाद्य पदार्थ पुरवठा करणाऱ्यांना अन्न सुरक्षित नोंदणी परवाना आवश्यक असणार आहे. यात डबेवाला, ऑनलाईन खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्या, किराणा दुकान, पानटपरी यांचाही समावेश असणार आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडे आता खाद्य पुरवठा करणाऱ्यांची सर्व माहिती असणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या, की अन्नसुरक्षा कायद्यात आधीपासून हा नियम आहे. अन्न हाताळण्या सर्वांकडे नोंदणी परवाना असणे आवश्यक आहे. जेवणाची डिलीव्हरी योग्य पद्धतीने व्हायला हवी. तरच, लोकांपर्यंत पोषक आहार पोहोचेल.
डिलिव्हरी बॉईज ना यासंबंधीचा अर्ज ऑनलाईन भरावा लागणार असून, त्याचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. डिलिव्हरी बॉईज च्या परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना १०० रुपयाचा अर्ज भरावा लागेल. या अर्जात सगळी प्राथमिक माहिती भरून द्यावी लागणार आहे. डिलिव्हरी बॉयला अन्नाची विक्री, डिलिव्हरी करताना परवाना स्वतःकडे बाळगणे अनिवार्य आहे अन्यथा कारवाई होईल.