मुंबई - राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. त्यामुळे गड, किल्ले आणि परिसरात मद्याचे सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांवर चाप बसणार आहे. एखादा व्यक्ती दारू पिऊन गैरवर्तन करताना आढळल्यास त्यावर यापुढे सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा आणि दहा हजारापर्यंत दंडाची कारवाई होणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने यासाठीचा शासन निर्णय काढला असल्याने गड-किल्ले परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मदत होणार आहे. गृह खात्याच्या या निर्णयानुसार किल्ले आणि गड परिसरात दारू पिणे, दारूच्या नशेत गैरवर्तन करणे, असे प्रकार आढळल्यास संबंधित समाजकंटकांना तत्काळ पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या अधिनिय 25 मधील कलम 85 अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवायी केली जाणार आहे. त्यासोबत गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना आणि त्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा - '...तर यापुढे सरकारी प्रशिक्षणे मदरशांमध्ये किंवा बार आणि रेस्टॉरंटमध्ये ठेवा'
ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे ठिकाण वगळून इतर ठिकाणी दारूच्या नशेत गैर शिस्तीने वागल्यास त्यासाठी राज्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलमांतर्गत कारवाई केली जाते. त्याचाच आधार घेत गृहविभागाने गड किल्ले परिसरात दारू पिऊन नशेत गैरवर्तन करणाऱ्यांना आळा बसविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील गड-किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि त्यातील कलम याची माहिती देणारे फलक पुरातत्व विभागामार्फत लावले जावेत, असे आदेशही या शासन निर्यणामध्ये देण्यात आले आहेत.
हेही वाचा - 'मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ, अशी 'फेकमफाक' करणाऱ्यांनी 24 तास बार उघडे केले'