मुंबई : संपूर्ण राज्यभरातून मुंबईच्या आझाद मैदान येथे लिंगायत समाज एकत्र आला आहे. राज्य सरकारच्या विरोधात लिंगायत समाजाने आज महामोर्चाचे आयोजन केले आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मुख्य मागण्यांसह इतर आपल्या काही मागण्या घेऊन या आयोजन करण्यात आले आहे.
22 वेळा मोर्चे काढले : आधीही याच मागण्यांसाठी लिंगायत समाजाकडून जवळपास 22 वेळा मोर्चे काढण्यात आले होते. मात्र एवढ्या वेळा मोर्चे काढूनही सरकार आपल्याकेड दुर्लक्ष करत असल्याने लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथे लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात आंध्र प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये लिंगायत बांधव सहभागी झाले आहेत. लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी समाजाला अल्पसंख्याक म्हणून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदने दिले होते. मात्र, अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. या मागणीसाठी समाजातील काही संघटना पुन्हा मोर्चाच्या तयारीत असून, मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात चर्चा : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. मात्र अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने लिंगायत समाज रस्त्यावर उतरला आहे. या मोर्चात लिंगायत समाजातील खासदार आणि आमदार देखील सहभागी होणार असणार असल्याची माहिती आहे. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायताच्या समाजाच्या मागण्या : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता द्या. राज्यातील लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा द्या. लिंगायत युवकांच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. मंगळवेढा येथे मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभा करावा. राष्ट्रीय जनगणनेत लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम करावा. लिंगायत समाजातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह बांधून द्यावे. मिरज रेल्वे जंक्शनला जगतज्योती महात्मा बस्वेश्वर रेल्वे जंक्शन असे नाव द्यावे. प्रत्येक गावामध्ये लिंगायत रुद्रभूमी (स्मशानभूमी) साठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा त्यांच्या मागण्या आहेत.
हेही वाचा : Sakal Hindu Samaj Morcha: दादर येथे आज सकल हिंदू समाज मोर्चा; 'हे' आहेत वाहतुकीत बदल