मुंबई- मंगळवारी सकाळी आरे जंगलातील युनिट 13 मधील तबेल्यात दररोज प्रमाणे कामं सुरू होती. याचवेळी अचानक बिबट्याचे एक पिल्लू वेगात धावत तबेल्यात घुसले. पुढे चार पाच मिनिटांसाठी त्या बिबट्याच्या पिल्ल्याने तबेल्यात दहशत निर्माण केली. जनावरांच्या दावणीत शिरलेल्या या बिबट्याच्या पिल्ल्यामुळे जनावरे भेदरून गेली होती. त्यानंतर हे पिल्लू आपणहुन तबेल्यातून निघून गेले. तेव्हा कुठे तबेलेवाल्यांचा जीव भांड्यात पडला. बिबट्याच्या पिल्लाच्या या दहशतीचा व्हिडिओ सद्या चांगला व्हायरल होत आहे.
आरेतील तबेल्यात बिबट्याच्या पिल्लाची दहशत आरे जंगलात मोठ्या संख्येने वन्य प्राणी आहेत. पण गेल्या काही वर्षांत काही वन्यप्राणी थेट आरेतील लोकवस्तीत आणि कधी कधी आरेबाहेरच्या वस्तीत ही शिरताना पाहायला मिळतात. विकास कामांच्या नावाखाली जंगलात मानवी हस्तक्षेप होऊ लागला आहे. परिणामी वन्यप्राणी जंगलाबाहेर येत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी अशाच प्रकारे बिबट्याचे एक पिल्लू आरेतील युनिट 13 मध्ये आले. जंगलातून वेगात धावत रस्ता पार करून हे पिल्लू थेट एका तबेल्यात शिरले.
आरेतील तबेल्यात बिबट्याच्या पिल्लाची दहशत अचानकपणे आलेल्या या पिल्लाला पाहून तबेल्यातील कर्मचारी घाबरले. पण हे पिल्लू थेट तबेल्यातील गायी-म्हशींसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गव्हाणीत शिरले. त्यावेळी गायी-म्हशींवर ते पंजा उगारू लागले. त्याच्या या दहशतीने तबेल्यातील म्हशी भेदरून गेल्या होत्या. पाच-सहा मिनिटांनी परत त्या बिबट्याच्या पिल्लाने गोठ्यातून पळ काढला. पिल्लू गेल्यानंतर अखेर सर्वाचा जीव भांड्यात पडला. दरम्यान बिबट्याच्या पिल्लाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.