मुंबई - विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात एकमत होण्यासाठी आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री उशिरा बैठक होणार असून, आघाडी सहा जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार 9 पैकी 4 जागा भाजप जिंकू शकते. तर दोन जागा शिवसेना, दोन जागा राष्ट्रवादी तर एका जागेवर काँग्रेसचा विजय निश्चित मनाला जात आहे. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्षांच्या जोरावर एक जागा भाजपकडून खेचून आणण्याची तयारी महाविकास आघाडी करणार असल्याचे चित्र आहे. एका जागेच्या तयारी संदर्भात आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
शिवसेनकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, आघाडीच्या इतर नेत्यांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तर भाजप चार जागा जिंकण्याच्या तयारीत असून, भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यातच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परळी विधानसभेत बंधू धनंजय मुंडे यांच्या कडून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांनतर पंकजा मुंडे यांनी या पराभवाला भाजपच्या जेष्ठ नेत्यांना जबाबदार धरले होते. तसेच मराठवाड्यात भाजपकडे कितीही मोठा चेहरा नसल्याने पंकजा मुंडे यांनाही परिषदेची अपेक्षा आहे.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांनाही गेल्या विधानसभेत पक्षाने तिकीट दिले नव्हते, त्यामुळे त्यांना ही परिषदेची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रातून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. तसेच आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाला ही एका जागेवर संधी देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मात्र, उमेदवारांची यादी भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून येणार असल्याने दोलायमान स्तिथी आहे.
राष्ट्रवादी कडून पक्षाचे कोशाध्यक्ष हेमंत टकले आणि कामगार नेते किरण पावसकर यांची ही मुदत संपली आहे. या दोन्ही नेत्यांनी थेट इच्छा व्यक्त केली नसली तरी त्यांना पुन्हा संधीची अपेक्षा आहे. काँग्रेसकडून भटक्या विमुक्त समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे हरिभाऊ राठोड यांनाही पुन्हा संधी मिळण्याची आशा आहे. तर काँग्रेसच्या चंद्रकांत रघुवंशी यांनी मुदत संपण्याच्या आधीच राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.
या निवडणुकीत पक्षीय बलाबल असे -
भाजप – १०५,
शिवसेना – ५६,
राष्ट्रवादी काँग्रेस – ५४,
काँग्रेस – ४४,
बहुजन विकास आघाडी – ३,
समाजवादी पार्टी – २,
एम आय एम – २,
प्रहार जनशक्ती – २,
मनसे – १, माकप – १,
शेतकरी कामगार पक्ष – १,
स्वाभिमानी पक्ष – १,
राष्ट्रीय समाज पक्ष – १,
जनसुराज्य पक्ष – १,
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १,
अपक्ष – १३
निवडून येण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपकडे 105 आमदार अधिक अपक्ष मिळून संख्याबळ 113 वर जाण्याची शक्यता आहे. चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी तीन मतांची गरज असून याची तयारी ही भाजपने केली असल्याचे बोलले जात आहे. तर आघाडीने विश्वास मत ठरावात 170 चे संख्याबळ दर्शवले होते. त्यानुसार शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसची एक जागा निवडून येणे शक्य आहे. पण सहावी जागा निवडणूक आणण्यासाठी आघाडीला आणखी 4 मतांची गरज लागणार आहे.
ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पद वाचवण्यासाठी घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी अडचणीच्या काळात होत असल्याने बिनविरोध व्हावी यासाठी ही प्रयत्न होत असला तरी आघाडीच्या पारड्यात आणखी एक जागा मिळवण्यासाठी ही प्रयत्न केला जाऊ शकतो असेही काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने सांगितले.
ज्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे त्या रिक्त झालेल्या जागा -
१. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद)
भाजप -
१. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस -
१. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर
काँग्रेस -
१. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (आधी राजीनामा दिला आहे)