मुंबई : उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना रामराम करत, मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर गोऱ्हे आणि ठाकरे प्रथमच समोरासमोर आले. विधान परिषदेत ठाकरेंनी आज हजेरी लावली. त्याचवेळी, गोऱ्हे यांनी ठाकरेंना चिठ्ठी पाठवली. मात्र, ठाकरे ती चिठ्ठी न वाचताच, सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे विधान परिषदेत चर्चेला उधान आले आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सकाळच्या सत्रात पायऱ्यांवर आंदोलन करत, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले. दुपारी 12 वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता विधानभवनात दाखल आले. नियमानुसार त्यानंतर परिषदेत त्यांनी हजेरी लावली. शिवशाही बस अपघात या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सुरू होती. तर, नीलम गोऱ्हे उपसभापती म्हणून कामकाज पाहत होत्या.
सतेज पाटील यांच्या बाजूला आसन : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर परिषदेतील आसन व्यवस्था बदलण्यात आली. उद्धव ठाकरे यांना सतेज पाटील यांच्या बाजूला आसन देण्यात आले. ठाकरे आसनस्थ झाल्यानंतर सतेज पाटील, एकनाथ खडसे, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी गुजगोष्टी करू लागले. शिवशाही बसवर चर्चेला आलेली लक्षवेधी संपायला आली. तब्बल अर्धा तास बसल्यानंतर ठाकरे जाण्यासाठी निघाले. तेव्हा ठाकरेंचे हावभाव पाहून, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना चिठ्ठी पाठवली. ठाकरेंनी ती चिठ्ठी न वाचताच, टेबलावर ठेवली. मात्र, सभागृहाबाहेर जाताना त्यांनी ती चिठ्ठी सोबत नेली. त्यामुळे या चिठ्ठीत काय लिहिले होते, याची चर्चा सभागृहात रंगली.
फडणवीसांचा ठाकरेंना नमस्कार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेच्या कामाला सभागृहात हजेरी लावली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. परंतु, ठाकरेंचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे फडणवीस यांनी अनिल परब यांना हातवारे करुन ठाकरेंना खुणावण्यास सांगितले. परब यांनी उद्धव ठाकरे यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार केला.
हेही वाचा - Nitesh Rane On INDA : भारताचे विभाजन करण्याचा विरोधकांचा कट - नितेश राणे