मुंबई - दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर तीव्र टीका होत आहे. शहिदांचा अवमान केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. आज (सोमवारी) सर्व डावे पक्ष एकत्र येत त्यांनी साध्वींच्या वक्तव्याविरोधात दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे माझ्याच शापामुळे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे वादग्रस्त विधान भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका सभेत केले होते. यानंतर सगळ्या स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, एसयूसीआय (कम्यु.), लाल निशाण, भाकप (माले), लिब्रेशन आदी डावे पक्ष सहभागी झाले होते.
प्रज्ञा सिंह ठाकूर या सध्या जामिनावर आहेत. साध्वी मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी आहेत. अशी व्यक्ती देशभक्त असलेल्या अधिकार्यावर शिंतोडे उडवते, याचा निषेध करण्यासाठी डावे पक्ष आज जमा झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, या सरकारने सैनिकांच्या शौर्याचा वापर सुद्धा आपल्या राजकारणासाठी केलेला आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे यांनी केला आहे.