मुंबई - मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या विरोधात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी हक्कभंग मांडला आहे.
काय आहे प्रकरण
महानगरपालिकेशी संबंधित विविध विकास कामांबाबत, जनकल्याणविषयक बाबतची माहिती विधिमंडळ व संसदीय कामकाजविषयक कर्तव्य पार पाडण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची विनंती विरोधी पक्षनेते दरेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, एखादा अपवाद वगळता कोणत्याही पत्रांना उत्तरे देण्यात आलेली नाहीत, असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांच्यावर केला. त्यामुळे या गंभीर प्रश्नी विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याविरुध्द विधानपरिषदेत हक्कंभग मांडला.
दोन ओळींचे उत्तर देण्याचे सौजन्यही आयुक्तांनी दाखवले नसल्याचा दरेकरांनी केला आरोप
विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी दरेकर यांना विशेषाधिकारभंग सूचना मांडण्याची परवानगी दिली. त्यावेळी हक्कभंग सूचना मांडताना दरेकर म्हणाले की, कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात पालिका आयुक्तांना अनेक पत्र दिली. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या. त्यांच्याकडे काही माहितीही मागवली होती. पण, विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रांना दोन ओळींचे उत्तर देण्याचे सौजन्यही आयुक्तांनी दाखवले नाही. प्रत्येकवेळी पत्रांना उत्तर देण्यासाठी टोलवाटोलवी केली. यामुळे विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराला न्याय देता येत नाही. विधिमंडळाच्या मूलभूत हक्कावर यामुळे गदा आली आहे, असेही दरेकर यांनी नमूद केले.
हेही वाचा - प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा - 'संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करत केंद्राने हुकूमशाही वृत्तीचा दाखला दिला'