मुंबई -दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा वाढत आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मुंबई शहरात दररोज कोरोनाचे नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे १८९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार १८२ झाला आहे.
मुंबईतील मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत ७१ रुग्णांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे. तसेच पालिकेकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमधून १ हजार १८२ पैकी ५३१ आढळून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईमधील आज देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ११ मृत्यूंपैकी १० जणांना दीर्घकालीन इतर आजार होते. एकूण ११ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासात झाला आहे. तर ३ जणांचा मृत्यू ५ ते ९ एप्रिल दरम्यान झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कोरोनामुळेच झाला का याबाबत समितीचा अहवाल येणे बाकी होता. हा अहवाल आज आला असून त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासात २ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आला आहे. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाची संख्या यामुळे ७१ झाली आहे.
मुंबईत आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ जणांनी आंतराराष्ट्रीय प्रवास केला होता. मुंबईत जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत त्या ठिकाणी पालिका शोध मोहीम राबवत आहे. अशा शोध मोहिमेतून मुंबईमधील १ हजार १८२ पैकी ५३१ रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना केंद्रे -
भारत सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने कोरोनाच्या रुग्णांवर ३ स्थरावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना केअर सेंटर, विशेष कोरोना हेल्थ सेंटर आणि विशेष कोरोना रुग्णालये यात रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यात दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे, रुग्णाच्या सहवासातील, जे पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांच्यामध्ये लक्षणे नाहीत, ज्यांच्या चाचण्या झाल्या आहेत परंतू त्यांचा रिपोर्ट आला नाही अशा रुग्णांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर ११ विशेष कोरोना हेल्थ सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. तर गंभीर आणि ज्यांना इतर आजार आहेत अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या २६ विशेष कोरोना रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत.