मुंबई - दरड कोसळल्यानंतर खेड तालुक्यातील केळणे गावातील ग्रामास्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत काहीही घडू शकते, या धास्तीने रहिवाशांनी स्वतः हून गावातील 2 किलो मिटरवरील धनगरवाड्यात स्थलांतर केले आहे. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. ईटीव्ही भारतचा याबाबत संदर्भातील ग्राऊंड रिपोर्ट...
पुन्हा आपत्ती ओढवल्यास धोका
राज्यात 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. विविध भागात दरडी कोसळण्याच्या धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडल्या. अनेक गावे जमिनीखाली गाडली गेली. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तहानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पोसरे आणि केळणे गावातही दरडी कोसळल्या. पोसरे गावात 24 जणांचा मृत्यू झाला. तर सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या केळणे गावात दरड कोसळून केवळ वित्त हानी झाली. पोसरे गावातील या भागातील नागरिकांचे शासनाने तत्काळ स्थलांतर केले. मात्र केळणे गावातील रहिवाशांची साधी विचारपूसही करण्यास प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. पुन्हा आपत्ती ओढवल्यास धोका संभवतो. त्यामुळे येथील १५ कुटुंबं 22 जुलैपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाड्यात एकत्रितपणे राहत आहेत. शासनाने याची दखल घेऊन आमचे गावातच पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी या स्थलांतरी झालेल्यांची आहे.
![केळणे येथे भूस्खलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_16082021141316_1608f_1629103396_59.jpg)
तहसीलदार येणार होते पण...
दरड कोसळून २४ दिवस झाले. तहसीलदार काल (16 ऑगस्ट) पाहणीसाठी येणार होते. आपल्याला भेडसावणाऱ्या अडी अडचणी त्यांच्यासमोर मांडता याव्यात, यासाठी रानातून पायवाट तुडवत संपूर्ण कुटुंब- कबिल्यासहित येथे आले. परंतु, 'कसलं काय? दिवसभरात कोणीही फिरकलं नाही. केवळ आश्वासनं दिली जात आहेत. राजकीय किंवा प्रशासकीय यंत्रणांकडून आम्हाला अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तुम्ही आलात, आमच्या कथा तुमच्यापुढे मांडल्या. आता तरी न्याय मिळतो का बघू', अशी खंत रहिवाशांनी ईटीव्हीपुढे व्यक्त केली.
गावातच पुनर्वसनाची मागणी
'रात्री 8 वाजता दरड कोसळली. तो प्रसंग बाका होता. नशीबाने आम्ही वाचलो. जिवितहानी येथे झाली नसली तरी गुरांचे वाडे जमिनदोस्त झाले आहेत. वित्तहानी झालेली आहे. ग्रामपंचायतीने परिस्थितीची पाहणी केली. शासकीय यंत्रणांकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. अन्नधान्य कीटचे वाटप केले. मात्र, गरजा पूर्ण केलेल्या नाहीत. गावाचे ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटना व मदतनीस सहकार्य करत आहेत. शासनाने या भयावह स्थितीची पाहणी करुन तत्काळ रहिवाशांचे गावातच पुनर्वसन करावे', अशी स्थानिक रहिवासी बाळाराम बंगाल यांची मागणी आहे.
राज्य शासनाने दखल घ्यावी
'अंगावर काटा आणणारे दृश्य होते. धो-धो पाऊस आणि त्याचवेळी दरड कोसळल्याने रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जिवाची पर्वा न करता अनेकांनी मार्ग मिळेल तिकडे धाव घेतली. आज 20 ते 25 दिवस भातवडे गावातील जंगलात राहतोय', असे सुनीता बंगाल यांनी सांगितले. राज्य शासनाने याची दखल घेऊन प्रशासनाला तत्काळ आम्हाला मदत करावी, असे त्या म्हणाल्या.
तर, पूरग्रस्त, नुकसानग्रस्त गावांची माहिती मिळाली आहे. एक-दोन दिवसात पाहणी करणार आहे, असे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणकडून मदतीचा हात
राज्यात ओढवलेल्या पूरस्थितीचा तडाखा कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला बसला. कोकणात मोठ्या प्रमाणात हानी झाली. दरडी कोसळून निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न, कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाण मुंबईने ही बाब विचारात घेत, 'आपल्या माणसासाठी आपले कर्तव्य' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. दोन दिवस हा उपक्रम कोकणासह तळकोकणात राबवला जाणार आहे. शनिवारी चिपळूण- खेड तालुक्यातील केळणे आणि पोसरे, संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण गावातील नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना सेवाभावी वृत्तीतून अन्नधान्य किट, मुला- मुलींना कपडे, महिलांसाठी साड्या, वयोवृद्धांसाठी मदत करण्यात आली.