मुंबई : Lalit Patil Arrest : ८ ऑगस्टला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही जण एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अन्वर सय्यद (वय ४२) याला १० ग्रॅम एमडीसह अटक केली. या अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. (Lalit Patil arrested) त्यानंतर जावेद अयुब खान (वय २७), आसिफ नाशीर शेख (वय ३०), इकबाल मोहम्मद अली (वय ३०), सुंदर राजन शक्तीवेल (वय ४४), हसन सुलेमान शेख (वय ४३), आरिफ नासिर शेख (वय ४२), आयुब अब्दुल सत्तार सय्यद (वय ३२), नासिर उमर शेख उर्फ़ चाचा (वय ५८), अजहर असमत अंसारी (वय ३२) आणि रेहान आलम सुलतान अहमद अंसारी (वय २६) यांना जे जे मार्ग, कल्याण शिळफाटा आणि नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. (Satyanarayan Chaudhary PC Mumbai) नंतर १४ वा आरोपी झिशान इक्बाल शेखला नाशिकहून अटक केली. तर याच प्रकरणात वॉन्टेड असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कर्नाटकमधील चन्नासंद्री हॉटेलमधून अटक केली आहे.
मी पळालो नाही तर मला पळवलं : ड्रग्ज माफिया पाटील बंधूंपैकी ललित पाटील विरोधात 2023 मध्ये बंडगार्ड पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस'चे दोन गुन्हे दाखल आहेत. तसेच 2020 मध्ये देखील ललित पाटील विरोधात चाकण पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस'चा गुन्हा दाखल आहे. आज सकाळी ललित पाटीलला मुंबईत आणून अटक करण्यात आली. दरम्यान वैद्यकीय तपासणी करून अंधेरीतील कोर्टात हजर केले. त्यावेळी मी पळालो नाही तर मला पळवलं, या वक्तव्याचा पुणे पोलीस तपास करतील, असे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. ललित पाटील याच्या पोटावर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्याचे ऑपरेशन झाले होते. तो लठ्ठ असल्याने पळून जाऊ शकत नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ललित पाटील विवाहित : तसेच ललित पाटीलचे लग्न झालेले असून, त्याला ३, ४ वर्षांची दोन लहान मुले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. तो या ड्रग्सच्या काळ्या धंद्यात कधी आला? याचा तपास पोलीस करत आहेत. ललित पाटीलला अटक करताना जो काही मुद्देमाल मिळालाय, तो तपासाचा भाग आहे. त्याची स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली आहे. 'ड्रग्ज फ्री मुंबई' हे आमचे मिशन असल्याचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले.
ललित पाटील कुठे-कुठे फिरला? : ललित पाटील गेले १० दिवस पुणे ते कर्नाटक असा फिरला. तो स्वतः स्कॉर्पिओ कार चालवून १० दिवस फिरत होता. याची मुंबई पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली होती. ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी धुळ्यातील चाळीसगावात पोहोचला. धुळ्यानंतर औरंगाबाद, त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये जाऊन तीन दिवस राहिला. मुंबई पोलिसांची एकूण पाच पथकं त्याच्या मागावर होती. गुजरातमधून ललित पाटील समृद्धी महामार्ग पकडून सोलापुरात आला आणि त्यानंतर त्याने कर्नाटकात प्रवेश केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अखेर त्याला अटक करण्यात आली. तो बंगळुरूमधून परदेशात पळण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा: