नवी मुंबई - गेल्या 17 तारखेपासून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली असून, मार्केटमध्ये येणाऱ्या व्यक्तींची थर्मल टेस्ट करण्यात येत आहे. मात्र, ही थर्मल टेस्ट कोणतेही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून करून न घेता चक्क बाजारसमितीत कार्यरत मजुरांकडून करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थर्मल टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही थर्मल टेस्टींग वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून न करता बाजार समितीमधील काही मजुरांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले आहे. थर्मल टेस्ट तुम्ही का करत आहात? असा प्रश्न ग्राहकांची टेस्ट करणाऱ्या मजुरांना विचारला असता, आमच्या मालकांनी आम्हाला ग्राहकांची टेस्ट करण्यास सांगितले आहे, असे उत्तर या मजुरांनी दिले आहे. या मजुरांना तपासणीबद्दल कितपत माहिती असावी? तसेच या मजुरांच्या आरोग्याचे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामधून बाजार समितीचा गलथानपणा समोर आला आहे.