मुंबई : मागील काही दिवसांपासून शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणार काहीशी अस्थिरता निर्माण झाली होती. विविध आंदोलने झाली. राजीनामा परत घेण्याची मागणी करण्यात आली होती. शरद पवार यांनी जनतेसाठी राष्ट्रीय अध्यक्षपद पुन्हा स्वीकारले. परंतु त्या अगोदर पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असणार? यावर चर्चा सुरू होती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणाला अध्यक्ष करणार का? त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होईल का, अशी शंका उपस्थित झाल्या होत्या.
तणावाच्या चर्चा : सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील तणावाच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. यावर माझा अजिबात विश्वास नाही. दोघे नेते बहिण -भाऊ आहे. एका विचारांचे देखील आहेत. शरद पवारांचा निर्णय दोघांनाही आवडलेला आहे. कार्यक्षम म्हणून दोघांचीही ओळख आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
भविष्यामध्ये जोरदार सत्ता : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात येणाऱ्या भविष्यामध्ये जोरदार सत्ता संघर्ष होणार आहे. वरवर जरी दोघे शांत असलेले दिसत असले, तरी प्रत्यक्षात मात्र उलट असल्याचे वाटते. सगळे काही अलबेल असल्याचे दोघेही भासविण्याचा प्रयत्न करत आहे. सत्य मात्र वेगळे आहे. दोघे काय पावले उचलतील याचा अंदाज बांधणे आता तरी कठीण आहे. सुप्रिया सुळे यांना पुढे नेण्याची शरद पवार यांची इच्छा आहे. त्यासोबत अजित पवार यांना बाजूला करायचे आहे. पण अजित पवार इतके अपरिपक्व आणि लहान नेते नाही. जेव्हापासून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून अजित पवार हे शरद पवारांसोबत आहे.
राजीनामा नाट्य झाले : अजित पवारांनी गावागावात पक्ष पोहोचवला. त्यावेळी सुप्रिया सुळे या ॲक्टिव्ह नव्हत्या. त्यामुळे शरद पवार अजित पवारांवर पूर्ण विश्वास ठेवत होते. अजित पवार वेगळा मार्ग स्वीकारू शकतात किंवा वेगळी चूल निर्माण करू शकतात. या भीतीपोटी शरद पवार अस्वस्थ आहेत. अजित पवारांनी असा निर्णय घेतला, तर त्यांचे वर्चस्व अजून राजकारणात वाढू शकते. या गोष्टीला शरद पवार घाबरलेले आहे. गेल्या तीन दिवसाचे राजीनामा नाट्य झाले आहे, ते याच कारणाने झाले आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवर शरद पवार यांची पकड किती दिवस ठेवणार आहेत. हे सांगणे आताच्या घडीला कठीण आहे. मात्र काहीही घडामोडी घडल्या, तरी अजित पवार यांचे वर्चस्व संपणार नाही, असे राजकीय विश्लेषक शंकर नारायण तिवारी सांगतात.
बहीण भावाचे नाते : देशातील अनेक पक्षाच्या नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राजकारणाचे धडे, मार्गदर्शन घेत असतात. शरद पवारांना राष्ट्रवादी पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोघांनाही सोबत ठेवावे लागणार आहे. भविष्यात दोघा बहीण भावाचे नाते अधिकच दृढ कसे राहील, याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करून ठेवला असेल, असे बोलले जात आहे.